हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्य संग्रामासाठी ज्या अनेक योध्यांनी त्यांचे जीवन समर्पित केले त्यातील एक मोलाचे नाव, पण केवळ योधाच नाही तर एक थोर समाज परिवर्तक, अत्यंत खडतर परिस्थिती मध्ये उच्च शिक्षणामध्ये स्वताचा ठसा उमटवणारे एक विलक्षण व्यक्तिमत्व असे विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ भाई कोतवाल.
वीर भाई कोतवाल यांचा जन्म नाभिक समाजातील एका गरीब कुटुंबात दि. १ डिसेंबर १९१२ रोजी रायगड जिल्ह्यातील माथेरान या ठिकाणी झाला. इयत्ता चौथी पर्यंतचे शिक्षण माथेरानच्या शाळेमध्ये घेतल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले. पुण्यामध्ये ते त्यांच्या आत्या गौरीताई हळदे यांच्याकडे राहिले. पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पुण्यातील वाडिया कॉलेज मधून मानसशास्त्र हा विषय घेऊन पूर्ण केले. शिक्षणासाठीचा त्यांचा ध्यास कौतुकास्पद होता. म्याट्रिक परीक्षेत संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ते पहिले आले. शिक्षणाची कास त्यांनी केव्हा सोडली नाही. पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन ते माथेरानला परतले. पुढे कायद्याचे शिक्षण त्यांनी मुंबईमध्ये पूर्ण केले. १९४१ मध्ये ते वकील झाले.
१९३५ मध्ये पुण्यामध्ये असताना त्यांचा विवाह इंदू तुकाराम तीर्लापुरकर यांच्याशी झाला. त्यांना दोन मुले झाली. मुलगा भारत आणि मुलगी जागृती. पण दुर्दैवाने मुलगी केवळ दोन महिन्याची असतानाच तिचा मृत्यू झाला.
पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन परतल्यानंतर भाई कोतवाल यांनी त्यांचे जीवन समाजकार्याला वाहून घेतले. सायक्लोनमध्ये वाताहत झालेल्या पश्चिम मुंबईच्या रहीवासी आणि मच्छिमार बांधवांच्या मदतकार्यात ते पुढे आले. एका बाजूला इंग्रजी सत्ता तर दुसऱ्या बाजूला सावकारी पाशामध्ये अडकलेला शेतकऱ्याची दयनीय अवस्था ते पाहू शकत नव्हते . सावकारी पाशातून गरीब शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी त्यांनी सहकारी तत्वावर धान्यकोठी सुरु केल्या. गरिबांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा दिला. सर्वसामान्य लोकांना मतदार यादीत नोंदणी करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले . यामध्ये त्यांना स्थनिक कॉंग्रेस नेते राजाराम उर्फ भाऊसाहेब राउत यांचे सहकार्य मिळाले . गरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी एकूण ४२ हॉलेंटरी शाळा सुरु केल्या. सन १९४० मध्ये त्यांनी कामगार व मजूर यांना एकत्र आणले, त्यावेळी अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, लालजी पेंडसे यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते. १९४१ मध्ये माथेरान नगरपरिषदेची निवडणूक जिंकून ते नगरपरिषदेचे व्हाईस चेअरमन झाले.
८ ऑगस्ट १९४२ रोजी गवालिया टंक येथील सभेत महात्मा गांधी यांनी ब्रिटीश राजवटीला “” चले जाव ““ चा नारा दिला त्यावेळी भाई कोतवाल सुद्धा उपस्थित होते. ब्रिटीश सरकारने सर्व नेत्यांची अटक सुरु केली. भाई कोतवाल यांच्यावरही अटक व्हॉरंट निघाला . त्यावेळी “ “जगेन तर स्वातंत्र्यात नाहीतर स्वर्गात” “ अशी शपथ घेऊन भूमिगत झाले.
भाई कोतवाल यांनी भूमिगत होऊन एक समांतर सरकार चालवायला सुरवात केली. त्यासाठी त्यांनी आगरी, कातकरी, हॉलेंटरी शिक्षक, शेतकरी यांचा एक दस्ता बनविला. यामध्ये जवळपास ५० वीरांचा समावेश होता . तो दस्ता म्हणजेच “ कोतवाल दस्ता “. ब्रिटीश सरकारला नामोहरम करण्यासाठी मुंबईला होणारा वीज पुरवठा तोडण्याचे त्यांनी ठरविले. सप्टेंबर १९४२ ते नोव्हेंबर १९४२ या दरम्यानच्या काळात त्यांनी एकूण ११ विजेचे मनोरे उद्वस्त करून ब्रिटीश उद्योग आणि रेल्वे ठ्ठप करून टाकली .
नामोहरम झालेल्या ब्रिटीश सरकारने भाई कोतवाल यांना पकडण्यासाठी आर हॉल आणि स्ताफोर्द या विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. तसेच रुपये २५०० रोख इनाम जाहीर केले. कोतवाल दस्ता हा मुरबाड तालुक्यात सिधगढच्या जंगलामध्ये होता. त्यांनी पाठविलेले मदतीचे पत्र दुर्दैवाने एका जमीनदाराच्या हाती पडले. बक्षिसाच्या लालसेने त्या जमीनदाराने ते पत्र ब्रिटीश अधिकारी हॉल याला दिले .
दि. २ जानेवारी १९४३ रोजी पहाटे आझाद हिंद दस्ता दुसऱ्या सुरक्षित ठीकाणी निघण्याच्या तयारीत असतानाच हॉल आणि स्ताफोर्द फौझानी त्यांच्यावरती हल्ला केला. त्यामध्ये आझाद हिंद दस्त्ताच्ये उप सेनापती गोमाजी पाटील यांचा मुलगा हिराजी पाटील जागीच मृत्यूमुखी पडले वीर भाई कोतवाल यांच्या मांडीमध्ये गोळी लागून जखमी अवस्थेत झाडाखाली पडले असतानाच ब्रिटीश क्रूरकर्मा हॉल याने त्यांना अत्यंत जवळून गोळी झाडली आणि तेथेच या थोर वीराच्या दैदिप्यमान जीवनाचा अंत झाला.
अशा या थोर वीराला नतमस्तक अभिवादन !!!